


अमलताश ... ज्याला मराठीमधे बहावा आणि इंग्रजी मधे Golden shower tree किंवा Indian laburnum म्हणून ओळखतात तो हा सोन्याच्या मणी झाडाला जणू लटकवलेले दिसावेत तसा दिसणारा अतिशय देखणा वृक्ष. माझा अत्यंत आवडता.
सिक्किम भूतान ट्रेकची सुरुवातच अमलताशाच्या पूर्ण बहरात असलेल्या सोन्याच्या माळांनी लगडलेल्या वृक्षाच्या दर्शनाने झाली. पेलिंग च्या दिशेने जाण्यासाठी न्यूजलपैगुरी स्टेशनवर भल्या पहाटे उतरल्यावर पाठीवर सामान आणि मनावर सतत दोन दिवसांच्या प्रवासाचे श्रम घेऊन आम्ही उतरलो तेव्हा फ़ारसे उत्साही नव्हतो. खरतर सिक्किमच्या ह्या ट्रेकमधे निसर्ग आणि जंगल दर्शनाच्या मनात जास्त अपेक्षा मुद्दामच ठेवल्या नव्हत्या कारण एकतर आम्ही जात होतो एप्रिल संपता संपता म्हणजेच सिक्किम मधल सुप्रसिद्ध ऑर्किड्स आणि र्होडेडेन्ड्रॉन्स चा सिझन संपत आलेला असताना. दुसरे कारण नुकताच पार पाडलेला कोस्टल गोवा आणि कर्नाटक च्या जंगला मधला ट्रेक. कुवेशी, दुधसागर, महाविर संरक्षित अभयारण्य अशी एकाहून एक सरस, घनदाट जंगले पायाखालून जाऊन सुद्धा ट्रेकच्या लांबलचक आणि खडतर मार्गामुळे मनासारखा ह्या जंगलांचा आस्वाद काही घेता आला नव्हता. एखादे वेगळ्या पर्णसंभाराने दाटलेले झाड किंवा वेगळ्याच आकाराची फ़ुले सामोरी येऊन सुद्धा केवळ पुढच्या camp चा टप्पा वेळेत गाठायचा आहे, आजूबाजूला अस्वलांचा वावर आहे वगैरे कारणांमुळे भराभर पावले उचलावी लागली होती. थोडक्यात बोरकरांच्या भाषेत सांगायचे तर फुलांचे रंग नुसते पाहून घेतले पण तिथे जाऊन वास घेतलाच नाही.
पण NJP ला जेव्हा स्टेशनचा आडवा ब्रीज आणि उतरती पायवाट संपवून खाली आलो तर समोरच डाव्या हाताला हा अमलताश आपले सुवर्ण वैभव मुक्त हस्ताने उधळत समोर उभा. इतका बहरात आलेला सोनमोहोर मी खरोखर पहिल्यांदा पाहिला तेथे. मन फ़ार फ़ार प्रसन्न झाले त्या पहाटे. पुढे मग पेलिंग ला पोचेपर्यंत अमलताश अगदी रांगेने सुवर्ण मोहोरा ढाळत उभे असलेले दिसत होते आणि प्रत्येक वेळी मी अमृता, मिथिलाला ' अग बघ बघ काय दिसतोय अमलताश.. ' म्हणून जेरीस आणत होते. मजा म्हणजे पुढच्या संपुर्ण सिक्किम प्रवासात एक पेलिंग पर्यंतचा हा प्रवास सोडला तर ह्या वृक्षाने परत येईपर्यंत दर्शन काही दिले नाही.
हा अमलताश किंवा सोनबहावा आपल्या इथलाच मुळचा म्हणजेच indegenous tree. त्याचे शास्त्रीय नाव आहे cassia fistulaa. साधारण 40 ft इतक्या उंचीपर्यंत वाढणारा हा वृक्ष बागेत किंवा रस्त्याच्या कडेला लावला जातो तो त्याची फ़ुलांनी बहरलेला असतानाची अवर्णनीय शोभा नजरेचे पारणे फेडते म्हणूनच. tropical region मधले हे झाड पाण्याचे दुर्भिक्ष्य किंवा कोरडे दुष्कळी वातावरणही सहन करु शकते कदाचित म्हणूनच महाराष्ट्राच्या जळगाव, धूळे किंवा अगदी विदर्भातही बहाव्याचे अस्तित्व जाणवते. भरपूर सूर्यप्रकाशात, गरम आणि कोरड्या हवेत ह्याचा सोनमोहोर खर्याखुर्या सोन्याला लाजवेल अशा तेजाने झळाळून निघतो. ह्याचे कुटुंब Fabaceae . पुर्ण बहरात असताना झाडावर एकही हिरवे पान शिल्लक रहात नाही हे ह्याचे वैशिष्ट्य. पाने छोटी, मोठ्या रुपयाच्या आकाराची आणि देठाला bipinnate म्हणजे द्वैदली संयुक्त पद्धतीने जोडली गेलेली असतात. सदाहरित अशी ही नाजूक पाने झालरीसारखी डुलत असतात वार्यावर. चार ते पाच छोट्या पाकळ्यांची फ़ुले अत्यंत नाजूक आणि देखणी. फ़ुलांचे लांबट आकारातले घोस खालच्या दिशेला झुकलेले अगदी बारा इंच लांबीपर्यंतही असतात. म्हणूनच मण्यांचे हार टांगून ठेवल्यासारखी आरास झाडांवर दिसते.
झाडाला शेंगा येतात ज्यात बर्याच बिया असतात. झाडे झटपट वाढतात आणि रुजतातही लगेच पण आयुष्य जास्त नसते. कदाचित झाडाच्या देखणेपणाला नजरही पटकन लागत असेल. झाडाचे एक वैशिष्ट्य म्हणजे नुसतेच रस्त्याच्या कडेला किंवा बागेत देखणपणासाठी हे झाड उपयोगात येते असे नाही तर ह्याच्या मुळांना nitrogen fixing चा गुणधर्म असतो. त्यामुळे आजूबाजूला हळू वाढणारी झाडे लावली तर अमलताशा सारखे वृक्ष त्यांना भरभर वाढायला मदत करतात.
वृंदावनाच वनवैभव अमलताश वृक्षांमुळे वाढल्याचा उल्लेख स्कंदपुराणांत येतो. तर बस्तरची निबिड घाटी अमलताशाच्या सोनेरी माळांमुळे कशी देखणी बनली आहे ह्याचे वर्णन हा कवी करतो....
अमलताश के
मुस्काते फूलों की
फैलती जब भी गंध
तब अमलताश भी शर्माकर
हिचहिचाकर
अपनी टहनियां सिकोड़ लेता है
अपनी ही बाहों में
और डहलिया, कचनार भी
गुनगुनाते है गीत बसंत के
पत्तोंपे सिमटती है सोनेकी छाया अमलताश की
बस्तरोंके घने पहाडोंमे...
जयपूरला एक संपूर्ण मोठा प्रशस्त रस्ता दोन्ही बाजूंनी ह्या सोनबहाव्याच्या झाडांनी सजलेला आहे असे माझी तिथे रहाणारी मैत्रीण सांगते. त्या रस्त्याचे नावच मुळी ' मणिहारों का रास्ता ' असे आहे. पुढच्या एप्रिल मधे जेव्हा तो संपुर्ण रस्ता सोनेरी पिवळ्या वर्षावात नहात असेल तेव्हा मी नक्कीच तिथे असेन. तुम्ही?
Golden shower Tree or Indian labarnum
Kingdom:
Plantae
Division:
Magnoliophyta
Class:
Rosopsida
Order:
Fabales
Family:
Fabaceae
Subfamily:
Caesalpinioideae
Tribe:
Cassieae
Genus:
Cassia
Species:
C. fistula